300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Sunday, 22 May 2011

Tagged under: ,

कॅश ( Cash ) म्हणजे ' धन ' कमविण्याचा कॅश ( KASH ) मंत्र

बिल गेट्स ( Bill Gates ) :- हार्वर्ड मधला ड्रॉप आऊट. Microsoft ची स्थापना.

लेरी अलीसन ( Larry Elloson ) :- युनिवर्सिटी ऑफ इलिनॉय ( Illinois ) आणि युनिवर्सिटी ऑफ शिकागो ( Chicago ) मधून ड्रॉप आऊट. Oracle ची स्थापना.

स्टीव जॉब्स ( Steve Jobs ) :- रीड कॉलेज ( Reed College Portlad ) मधून ड्रॉप आऊट. Apple ची स्थापना.

मार्क झुकेरबर्ग( Mark Zuckerberg ) :- हार्वर्ड मधून ड्रॉप आऊट. Facebook ची स्थापना.

जेरी यांग ( Jerry Yang ) आणि डेव्हिड फिलो ( David Filo ):- दोघेही Stanford युनिवर्सिटी मध्ये पी. एच डी. करत होते. शिक्षण अर्धवट सोडले. Yahoo ची स्थापना.

सर्जी ब्रिन ( Sergey Brin ) आणि ल्यारी पेग ( Larry Page ) :- दोघेही Stanford मध्ये पी. एच डी करत होते. शिक्षण अर्धवट सोडले. Google ची स्थापना

वरील लोकांमधे एक गोष्ट कॉमन आहे . ती म्हणजे ही सर्व मंडळी शिक्षण अर्धवट सोडलेली आहेत . त्यातील कांही जणांकडे डिग्र्या आहेत. पण अंतिम शिक्षण पूर्ण केलेले नाही. पण आज ही सर्व मंडळी प्रसिध्दी झोतात आहेत, ती त्यांनी स्थापन केलेल्या कंपन्यांमुळे !

आज जगातल्या श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांची गणना होते आहे . हे कसे शक्य झाले ? शिक्षण पूर्ण न करता सुध्दा त्यांना हे कसे जमले ?

मराठी समाजात पहिल्या पासूनच शिक्षणाला महत्व आहे . शिक्षण क्षेत्रांत मराठी माणूस, विशेषतः मराठी स्त्रिया नेहमीच आघाडीवर राहिल्या आहेत. ही खरे तर एक चांगली आणि अभिमानाची बाब आहे. शिक्षणाने माणूस नुसता सुशिक्षितच बनत नाही तर हुशार, ज्ञानी, व्यवहारी बनतो. त्याला इतर अनेक कौशल्ये प्राप्त होतात असे समजले जाते. पण हल्लीचे शिक्षण हे फक्त डिग्र्या मिळविणे आणि डिग्र्यांची सर्टीफिकीटे ( Certificates) गोळा करणे एवढ्यापुरतेच मर्यादित राहिले असावे असे वाटू लागले आहे. कारण हल्ली शिक्षणातून मिळणाऱ्या ज्ञानापेक्षा मिळणाऱ्या डिग्र्यांना नको एवढे महत्व प्राप्त झाले आहे. ज्याच्याकडे जास्त डिग्र्या तो जास्त हुशार आणि ज्याच्याकडे कमी डिग्र्या तो कमी हुशार असे समीकरण बनले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे मराठी समाज अजूनही नोकरीच्या मानसिकतेमध्येच अडकलेला आहे. चांगल्या नोकऱ्या मिळविण्यासाठी, टिकविण्यासाठी आणि नोकरीतील प्रगतीसाठी डिग्र्यांची आवश्यकता ही असतेच असा समज आहे.

एखादा मनुष्य जर खरोखरच हुशार असेल पण त्याच्याकडे साधे १० वी किंवा १२ वी चे Certificate नसेल तर तो अशिक्षित आणि निर्बुध्द समजला जातो. या हिशोबाने संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम,समर्थ रामदास ही मंडळी तर अशिक्षितच समजायला हवीत. कारण ते कोणत्या शाळेत गेल्याचे किंवा त्यांच्याकडे कोठली Certificates असल्याचे अजूनपर्यंत तरी आढळून आलेले नाही . पण संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा, रामदास स्वामींचा दासबोध व मनाचे श्लोक हे ग्रंथ गेली शेकडो वर्षे, पिढ्यान पिढ्या अगदी आवडीने आणि भक्ती भावाने वाचले जात आहेत. त्यांची पारायणे होत आहेत . अजूनही हे ग्रंथ मराठीतील ' बेस्ट सेलर ' या कॅटेगिरीत ( Category ) मोडतात. हे कशाचे प्रतिक आहे ?

फक्त इयत्ता ४ थी पर्यंत शिकलेला आणि रेल्वेच्या डब्यात वर्तमान पत्रे टाकणारा थॉमस अल्वा एडिसन ( Thomas Alva Edison ) जगातला मोठा, नावाजलेला शास्त्रज्ञ बनला. शेतकरी कुटुंबात जन्मलेला हेन्री फोर्ड (Henry Ford ) नावाचा फिटर जगातील मोठा मोटारींचा कारखानदार बनु शकला. त्याने स्थापन केलेली फोर्ड मोटर कंपनी ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी ऑटोमोबाईल ( Automobile) कंपनी आहे. साईचीरो होंडा (Soichiro Honda) हा जपानमधील एका गॅरेज मधे काम करणारा एक साधा मोटार मेकॅनिक पण मोटारींचा कारखानदार होऊ शकला .

त्याने स्थापन केलेली होंडा मोटर कंपनी जगातील सहाव्या क्रमांकाची सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी आहे . इंजिनिअरिंगच्या क्षेत्रांत या तिघांचे योगदान महत्वाचे आहे. पण या तिघांकडे इंजिनियरिंग ची कोठली डिग्री ,डिप्लोमा किंवा कोणतेही Certificate नव्हते. या सगळ्यांचा चुकून मराठी समाजात जन्म झाला असता, तर डिग्रीचे सर्टीफिकेट नाही म्हणून एडिसन शेवट पर्यंत वृत्तपत्र विक्रेता राहिला असता. तर हेनरी फोर्ड आणि होंडा हे अनुक्रमे फिटर व मेकॅनिक म्हणून राहिले असते आणि नोकरी करून निवृत्त झाले असते.

भारतातही अशी उदाहरणे आहेत. मुळात चित्रकलेचे शिक्षक असलेले बेळगावचे सायकल दुकानदार लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी किर्लोस्कर उद्योग समूहाचा पाया घातला. तर गुजरातमधील ग्रामीण भागातील एका प्राथमिक शिक्षकाच्या फक्त मॅट्रिक पर्यंत शिकलेल्या धीरूभाई अंबानी या मुलाने रिलायन्स उद्योग समूहाचा पाया घातला. तो सुध्दा कोणत्याही डिग्री, डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट शिवाय.

चंद्रकांत किर्लोस्कर यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की डिग्री मिळाली म्हणजे सर्व ज्ञान मिळाले असे नव्हे. डिग्रीचा अर्थ तुम्ही कांही पुस्तकांचा अभ्यास केला आहे आणि काही परीक्षा उत्तीर्ण झाला आहात एवढ्यापुरताच मर्यादित आहे. खऱ्या शिक्षणाची सुरवात शाळा, कॉलेजमधून बाहेर पडल्यावरच होते.

शिक्षणाच्या क्षेत्रांत मागे पडलेल्या वरील लोकांनी अपरंपार धन संपदा कमावली. आयुष्यात तुफान प्रगती केली . त्यातील कित्येक जण तर गरीब मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले. त्यांना उद्योग व्यवसायाची कोठल्याही तऱ्हेची कौटुंबिक पार्श्वभूमी नाही. आर्थिक परिस्थिती पण कधीच धडधाकट नव्हती. मग त्यांना एवढी प्रगती करणे कसे जमले ? त्यांना नशीबाची साथ मिळाली म्हणून?त्यांच्या पत्रिकेतील ग्रह उच्चीचे होते म्हणून? का दैवाची त्यांच्यावर विशेष कृपा होती म्हणून?

याचे कारण म्हणजे या सर्वांनी 'कॅश '( Cash ) म्हणजे धन कमविण्यासाठी ' कॅश ' ( KASH ) या मंत्राचा पुरेपूर उपयोग करून घेतला .

या ठिकाणी ' धन ' म्हणजे फक्त पैसा अडका समजू नये. धनामध्ये पैसा, संपत्ती, प्रतिष्ठा, गौरव, मान सम्मान , समाजात आदरणीय स्थान, चांगले मित्र - सहकारी - शिक्षक - विद्यार्थी या सगळ्यांचा समावेश होतो. धनाची किंमत फक्त पैशाने होत नसते.

तर हा ' कॅश ' ( KASH ) मंत्र काय आहे ते आता बघुया .

K - Knowledge - ज्ञान

A - Ability - क्षमता

S - Skill - कौशल्य

H - Habits - सवयी

K - Knowledge - ज्ञान :-

वरील सर्व जण, ज्या क्षेत्रात आपण काम करतो आहोत त्या क्षेत्राविषयी जास्तीत जास्त ज्ञान मिळविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहिले. ज्ञान अनेक मार्गांनी मिळविता येते. शाळा कॉलेजमधील शिक्षण हा ज्ञान मिळविण्याचा एक मार्ग झाला . त्याशिवाय प्रशिक्षण ( Training ), वाचन, संशोधन, प्रयोग, तज्ञांचे मार्गदर्शन, गाठी - भेटी, चर्चा , विचार -विनिमय , विचारांची देवाण घेवाण, प्रवास,प्रदर्शने, सेमिनार्स, कॉन्फरन्स या मार्गांनी पण ज्ञान मिळविता येते. आपले ज्ञान अत्याधुनिक

( Most Modern) आणि अद्ययावत ( Up to date ) असावे याची ते सतत काळजी घेत गेले. आपल्या क्षेत्रांत काय घडामोडी चालू आहेत, कोणते नवीन संशोधन होत आहे, कोणते नवीन ट्रेंड्स निर्माण होत आहेत यावर त्यांनी बारीक लक्ष ठेवले. कारण शेवटी ज्ञान हेच खरे भांडवल आहे हे त्यांनी अचूक ओळखले होते .

A - Ability - क्षमता:-

आपल्या क्षमतेवर त्यांचा पूर्ण विश्वास होता. आपण काय करू शकतो आणि काय करू शकत नाही याची त्यांना पूर्ण जाणीव होती. आपल्या क्षमतेबद्दल त्यांनी त्यांच्या मनात अविश्वासाची भावना कधीच येवू दिली नाही. ज्या क्षेत्रांत आपण कमी पडत आहोत त्या क्षेत्रांत इतरांची मदत घेण्यामध्ये त्यांना कधी कमीपणा वाटला नाही. आपली क्षमता सतत कशी वाढत राहील या कडे त्यांनी लक्ष दिले. आपल्या कल्पना इतरांपेक्षा जास्त चांगल्या आहेत. आपली उत्पादने इतरांपेक्षा जास्त चांगली आहेत. आपल्या आयडियाज इंतारांपेक्षा जास्त फायदेशीर आहेत याबद्दल त्यांना पूर्ण आत्मविश्वास होता. आपल्या बरोबर आपले सहकारी, संगठना, कंपन्या, कर्मचारी यांची क्षमता कशी वाढविता येईल या विषयी ते सतत प्रयत्नशील राहिले

S - Skill - कौशल्य :-

आपल्याकडे जे ज्ञान आहे त्याचा प्रत्यक्ष व्यवहारात उपयोग करण्याची जी प्रक्रिया असते त्याला कौशल्य म्हणतात. आपल्याकडे जर ज्ञान असेल पण प्रत्यक्ष व्यवहारात त्याचा उपयोग करता येत नसेल तर त्या ज्ञानाला फारसे महत्व उरत नाही. आपल्याला जे ज्ञान मिळाले आहे त्याचा व्यवहारामध्ये जास्तीत जास्त उपयोग व्हावा या साठी ते सतत प्रयत्नशील राहिले. यासाठी त्यांनी अनेक निरनिराळे प्रयोग केले. अनेक नवीन मार्ग शोधून काढले. अनेक नवीन कौशल्ये प्राप्त केली आणि विकसित केली. कोठलेही नवीन कौशल्य आत्मसात करायचे म्हणजे त्यासाठी भरपूर कष्ट लागतात, मेहेनत लागते. या ठिकाणी आपण कमी पडणार नाही याची ते काळजी घेत गेले. 'Practice makes the man perfect' या म्हणीप्रमाणे ते सतत आपल्या कौशल्याचा उपयोग करीत गेले. आपल्याबरोबर आपल्या सहकाऱ्यांच्या कौशल्यात सतत वाढ कशी होत राहील याची काळजी ते घेत गेले.

H - Habits - सवयी:-

आपल्या व्यवसायासाठी आवश्यक त्या सवयी त्यांनी स्वीकारल्या. तसेच आवश्यकतेनुसार या सवयींमध्ये बदल करण्याची लवचिकता त्यांनी दाखवली. या मधे त्यांच्या प्रमाणेच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा सहभाग होता. कित्येक वेळा त्यांना सर्वसाधारण कुटुंबाला मिळणाऱ्या साध्या-साध्या सुखांचा त्याग करावा लागला. पण या बद्दल त्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांनी कधी तक्रार केली नाही.

शिक्षणाला किती महत्व द्यायचे. त्यातून मिळणाऱ्या डिग्रीला किती महत्व द्यायचे हे प्रत्येकावर अवलंबून आहे. याचा अर्थ शिक्षणाची कास सोडावी असा होत नाही. कारण शिक्षण, मग ते कोणत्याही प्रकारचे असो, त्याला काही ना काहीतरी महत्व हे असतेच. तसेच प्रत्येक डिग्री, डिप्लोमा आणि सर्टिफिकेट ला महत्व हे असतेच. पण जर शिक्षण माणसाला फक्त पुस्तकी ज्ञान देऊन केवळ 'पुस्तक पंडित ' बनवत असेल. फक्त परीक्षेपुरता अभ्यास करून 'परीक्षार्थी' होण्याची प्रेरणा देत असेल. ज्याचा व्यवहारात फारसा उपयोग करता येत नसेल. जे माणसाचे 'व्यवहारज्ञान' न वाढविता माणसाला जास्त 'अव्यवहारी' बनवत असेल. केवळ नोकरीचे माफक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्याची प्रेरणा देणारे असेल. आणि ज्यामुळे प्रतिष्ठेचा खोटा तोरा निर्माण होत असेल. तर अशा शिक्षणासाठी आयुष्याची किती वर्षे आणि पैसा खर्च करायचा याचा विचार ज्याचा त्याने करायला हवा. एखादी डिग्री मिळाली म्हणजे सर्व कांही मिळाले असे समजू नये. तसेच डिग्री मिळाली म्हणजे शिक्षण संपले असे पण समजू नये. कारण शिक्षणाची प्रक्रिया आयुष्यभर चालू असते .तसेच शिक्षण नाही किंवा पूर्ण झाले नाही म्हणून मागे पडू ही भावना पण मनातून काढून टाकायला हवी.

हल्लीचे मराठी तरुण / तरुणी पुष्कळ Talented आहेत . अनेकांनी शिक्षण क्षेत्रांत उत्तम यश मिळवले आहे. पण अजूनही बरेच जण नोकरीच्या मानसिकते मधेच अडकले आहेत. मायक्रोसोफ्ट च्या बिल गेट्स सारखे न होता बिल गेट्स च्या मायक्रोसोफ्ट मधे नोकरी करण्याची स्वप्ने बघत आहेत किंवा धन्यता मानत आहेत. आणि त्यांचे पालक पण याचा अभिमान बाळगत आहेत. आज भारताची वेगाने जागतिक आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने प्रगती चालू आहे. याचा अर्थ जागतिक स्तरावर उद्योग व्यवसाय सुरु करण्याची संधी भारतीय तरुणांपुढे चालून आली आहे. मराठी तरुण/ तरुणींनी या संधीचा फायदा करून घेतला नाही तर त्यांच्या सारखे कर्म दरिद्री तेच ठरतील. आपल्या शिक्षणाला 'कॅश' ( KASH ) मंत्राची जोड देऊन मराठी तरुण /तरुणींनी बिल गेट्स किंवा मार्क झुकेरबर्ग सारखे व्हायचा प्रयत्न का करू नये ?

उल्हास हरी जोशी

ए -३/ ८, सारीतानगरी फेज १,
गणेश मळा , सिंहगड रोड
पुणे ४११ ०३०

E-Mail:-

ulhas_h_joshi@yahoo.co.in

joshiulhas5@gmail.com

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

0 comments:

Post a Comment