मराठी ब्लॉगींगला जगाच्या कानाकोपर्यात राहणार्या सर्व मराठी बांधवांपर्यंत पोहोचविण्याचा वसा घेतलेल्या नेटभेट ई-मासिकाचा एप्रील २०१० चा अंक वाचकांसमोर आणताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. नेटभेट ई-मासिकाचा हा सातवा अंक. एक प्रयोग म्हणुन ऑक्टोबरमध्ये चालु केलेला हा उपक्रम आता चांगला नावारुपाला आला आहे. यंदाचा अंक प्रकाशित होण्यास थोडा उशीर झाला (त्याबद्दल क्षमस्व.) परंतु लगेचच वाचकांकडून मासिकाबद्दल विचारणा करण्यासाठी आलेल्या ईमेल्स मुळे आम्ही खरोखरच मनस्वी सुखावलो आहोत.
नेटभेट ई-मासिकाला रसिक वाचकांनी जो प्रतीसाद दिला आहे त्याबद्दल आम्ही वाचकांचे सदैव ऋणी आहोत. हे यश केवळ नेटभेटचे नसून जीवनातील विविधांगी विषयांना हात घालणार्या मराठी ब्लॉगर्सचे आहे. ब्लॉगच्या माध्यमातून साहित्यसेवा करणार्या सर्व मराठी ब्लॉगर्सना अभिवादन.
नेटभेट ई-मासिकामध्ये यावेळीही आम्ही विविध विषयांवरील खुमासदार लेखांचा नजराणा सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. भाग्यश्री सरदेसाईंनी (भानंस) कथा यात आहे, तसेच अनुजा ताईंनी आपल्या शब्दांनी जिवंत केलेले मस्कत ते सिंगापोरचे बोटप्रवास वर्णन देखिल यात आहे. रोहन चौधरी या ईतिहास जगणार्या अस्सल भटक्याची शिवदुर्गांची सफर या अंकात वाचकांना अनुभवायला मिळेल. सप्त शिवपदस्पर्श ही लेखमालिका आम्ही नेटभेटच्या पुढील काही अंकांत क्रमशः सादर करत आहोत.
याशिवाय अ,ब आणि क हा वेगळ्याधर्तीचा अप्रतीम लेख, चित्रपट, नाटक आणि टी.व्ही मालिका हिट करण्यासाठीच्या जाहिराती, काळा बाजार, एनजीओ- एक पैशांचा खेळ असे अनेकविध विषयांवरील लेखही वाचकांना आवडतील ही अपेक्षा आहे. नोकरी सोडून स्वतःचा उद्योग स्थापन करणार्या चंद्रशेखर आठवले यांचा 'आव्हान' हा प्रेरणादायी लेख आणि अरविंद अडिगा यांच्या The white tiger या पुस्तकाबद्दल हेरंब ओक यांनी मांडलेली मते वाचकांच्या खास पसंतीस उतरतील असा विश्वास आम्हाला आहे.
नेटभेट ईमासिक हा एक प्रयोग असला तरी यामागे एक दृढ, प्रगल्भ विचार आहे. ई-मासिकामध्ये अनेक तृटी राहल्या असतीलही मात्र यामागील आमची तळमळ लक्षात घेऊन वाचक आम्हाला माफ करतील याची खात्री आहे. या अंकाबद्दल प्रतीक्रीया, सुचना, अभिप्राय तसेच अंक वाचल्यानंतर जे काही विचार तुमच्या मनात येतील ते आम्हाला अवश्य कळवा. नेटभेट ई-मासिक डाउनलोड करुन ईमेल द्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमच्या या प्रयत्नाला पोहोचविण्यास आम्हाला मदत करा ही नम्र विनंती.
पुन्हा एकदा सर्व वाचकांचे आणि मराठी ब्लॉगर्सचे मनापासून आभार !!!
http://magazine.netbhet.com
धन्यवाद.
सलिल चौधरी

0 comments:
Post a Comment