300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Wednesday, 9 December 2009

Tagged under:

"उत्कृष्ट" बनण्याचा ध्यास !

मी अतुल अरुण राजोळी पुन्हा एकदा, नेटभेटच्या वाचकांना आणखी एका लेखाद्वारे भेटत आहे. मागील लेखात (हमखास यशाचा फोर्मुला) आपण यशस्वी माणसांच्या डोक्यात इंस्टॉल केलेल्या सॉफ्टवॅअरबद्दल जाणुन घेतले. या लेखात मी यशस्वी माणसांच्या एका महत्त्वाच्या गुणधर्माबद्दल बोलणार आहे.

मला नेहमी असा प्रश्न पडायचा की समाजातील फक्त काही माणसांचे उत्पन्न प्रचंड असते व इतर माणसांचे त्या मानाने खुपच कमी. असे का? रिसर्च असे सांगतो की जगातील फक्त ५% माणसांकडे जगातील तब्बल ९५% संपत्ती आहे व इतर ९५% माणसांकडे उरलेली ५% संपत्ती आहे. असे का? या प्रश्नाचे उत्तर मिळविताना केलेल्या अभ्यासामध्ये मला असे आढळून आले की मार्केटमध्ये नेहमी उत्कृष्ट परफॉरमन्सला उत्कृष्ट मोबदला मिळतो. ५% माणसे इतर ९५% माणसांपेक्षा प्रचंड पैसे कमवतात कारण त्यापैकी बहुतांश लोक त्यांच्या क्षेत्रातील उत्कृष्ट मानले जातात.

मार्केटमध्ये आपले उत्पन्न हे तीन बाबींवर अवलंबून असते. १) आपण काय करतो २) आपण जे करतो ते किती चांगल्या पध्दतीने करतो व ३) आपली जागा इतर कोणी भरुन काढणे किती कठीण आहे.
एक महत्त्वाचा गुणधर्म जो मला यशस्वी माणसांमध्ये प्रकर्शाने आढळला तो म्हणजे 'उत्कृष्ट बनवण्याचा ध्यास'. त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीतरी एक महत्त्वाचा निर्णय घेतला की आपण आपल्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट बनायचे. त्यांनी निर्णय घेतला, आपल्या कामाचा दर्जा अव्वल असला पाहिजे. त्यासाठी लागणारी किंमत ते मोजण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यासाठी बर्‍याच गोष्टींचा त्यांना त्याग करावा
लागला. त्यासाठी जेवढा वेळ द्यावा लागेल तेवढा वेळ देण्याची सुध्दा त्यांची तयारी होती. याच निर्णयाचा परिणाम असा झाला की सर्वसाधारण माणसांपेक्षा त्यांचे स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण झाले. ते उच्च श्रेणीमध्ये गणले जाऊ लागले व परिणाम स्वरुपी त्यांचे उत्पन्न इतरांपेक्षा दुप्पट, तिप्पट, चौपट किंवा दहा पट वाढले. 'इतर' म्हणजेच ज्यांनी आपल्या कामामध्ये उत्कृष्ट बनण्याचा निर्णय घेतला नाही असे ९५% लोक होय!

netbhet
सुप्रसिध्द हॉटेल उद्योजक व ऑर्किड या जगातील उत्कृष्ट इकोटेल हॉटेलचे मालक विठ्ठल कामत यांनी कर्जबाजारी असताना जगातील उत्कृष्ट इकोटेल हॉटेल बांधण्याचा निर्णय घेतला. आपल्या सर्वांचा लाडका मास्टर ब्लास्टर, जगातील उत्कृष्ट फलंदाज सचिन तेंडूलकर याने लहान वयातच उत्कृष्ट फलंदाज बनण्याचा निर्णय घेतला होता. दोन साधारण चित्रपट बनविल्यानंतर आशुतोष गोवारिकर यांनी 'लगान' नावाचा उत्कृष्ट चित्रपट बनविण्याचा निर्णय घेतला. भारताच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आपल्या लहान वयातच उत्कृष्ट गायिका होण्याचा निर्णय घेतला होता. घरातुन विरोध असुनसुध्दा माधुरी दिक्षितने उत्कृष्ट अभिनेत्री बनण्याचा निर्णय घेतला. अशी कित्येक यशस्वी माणसांची उदाहरणे मी देऊ शकतो ज्यांच्या या एका निर्णयामुळे त्यांचे आयुष्य बदलले. त्यांचे उत्पन्न प्रचंड वाढले व सर्वात महत्वाचे त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांचे एक असाधारण व अद्वितीय असे स्थान निर्माण झाले. ते यशस्वी झाले. त्यांच्या यशाची सुरुवात एका निर्णयामुळेच झाली. तो निर्णय म्हणजे... 'मला माझ्या क्षेत्रात उत्कृष्ट व्हायचं आहे'. हा एक निर्णय तुमचेही आयुष्य बदलु शकतो.

मित्रांनो, मी तुम्हाला आज एक आवाहन करतो, तुम्ही जे कोणी असाल, विद्यार्थी असाल, नोकरी करत असाल, किंवा उद्योजक असाल; ज्या क्षेत्रात असाल. त्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट बनण्याचा निर्णय तुम्ही आज घ्या. तुम्ही करत असलेल्या कामाचा दर्जा अव्वल असला पाहिजे असा निर्णय तुम्ही आज घ्या. तुम्ही केलेल्या कामाला जे अभिप्राय इतरांकडून मिळतील ते वॉव, उत्कृष्ट, अप्रतिम, अतिउत्तम, अविश्वसनिय, आउट स्टँडींग, माईंड ब्लोईंग, फॅनटास्टीक असेच असतील असा एक ठाम निर्णय तुम्ही आज घ्या. याक्षणी तुम्ही स्वतःला ठासुन सांगा 'I am going to be the best in my field'.

याक्षणी स्वतःला प्रश्न विचारा की उत्कृष्ट बनण्यासाठी कोणत्या गोष्टी तुम्हाला केल्या पाहीजेत? कोणता अभ्यास केला पाहीजे? कोणाला भेटले पाहीजे? कोणते नवीन ज्ञान मिळविले पाहीजे? कोणते कौशल्य आत्मसात केले पाहीजे? कोणती कृती केली पाहीजे? सध्या करत असलेल्या कामामध्ये कोणते सकारत्मक बदल केले पाहीजेत? आजच आत्ताच ठरवा. तुम्ही आत्ता जो ठाम निर्णय घेतला आहे तो फक्त मनातच ठेवू नका. तुमच्या डायरीत लिहून काढा. लक्षात ठेवा, लिहील्याने तुम्ही त्या निर्णयाबाबत अधिक ठाम व गंभीर बनता. म्हणूनच आत्ताच लिहा.

आता तुम्ही एक खुप महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आणि भविष्यात या निर्णयामुळेच तुमच्या क्षेत्रामध्ये तुमचे एक वेगळे स्थान निर्माण होणार आहे. माझं असं ठाम मत आहे की जेव्हा आपण एखादा निर्णय घेतो व लिहीतो, तेव्हा त्याला अनुसरुन कृती केल्या शिवाय गप्प नाही बसलं पाहीजे. मग आत्ताच तुमच्या निर्णयाला अनुसरुन एक कृती करा. काहीही! जेणे करुन एक सकरत्मक उर्जा निर्माण होईल. वेळ घालवू नका. आत्ताच एखादी कृती करा.

ही फक्त सुरुवात आहे. भविष्यात तुम्ही तुमच्या क्षेत्रात उत्कृष्ट म्हणून मानले जाण्यासाठी कुठुनतरी सुरुवात ही करावी लागणारच. ती सुरुवात आज आणि आत्तापासुनच करा.

तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनापासुन शुभेच्छा!

Thank You Very Much!

- अतुल अरुण राजोळी



Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

0 comments:

Post a Comment