ट्विटरचे जग १४० अक्षरांमध्ये फिरत असते. पण ट्विटरने या छोट्याशा वाटणाऱ्या मर्यादेत आपल्याला आपली कल्पकता वापरून व्यवसायाची वाढ करण्याच्या भरपूर संधी दिल्या आहेत. आपण अनेकविध नवनवीन कल्पना ट्विटर वापरताना अमलात आणू शकतो, ज्या आपल्याला आपल्या व्यवसायासाठी केवळ फोलोअर्सच नाही तर ग्राहकही मिळवून देऊ शकतात आणि आपला प्रभाव सोशल मिडिया आणि सर्च इंजिन यांवर निर्माण करू शकतात.
ट्विटरवरील संवादाचा अविभाज्य घटक म्हणजे ट्विटर हॅन्डल. १४० अक्षरांच्या प्रत्येक संदेशात मग तो व्यक्तिगत संदेश असो वा ट्विट – ट्विट करणाऱ्या व्यक्तीचे ट्विटर हॅन्डल असतेच. त्यामुळे आपण ट्विटर हॅन्डलबद्दल सर्व माहिती आणि ते कसे निवडावे, त्यामागे व्यावसायिक विचार आणि कल्पना काय असाव्यात याची चर्चा करणार आहोत आणि ट्विटर हॅन्डल निवडण्याबाबत आवश्यक तांत्रिक मर्यादा बघणार आहोत.
ट्विटर हॅन्डल म्हणजे काय?
प्रथम आपण ट्विटर हॅन्डल म्हणजे काय ते बघुयात. बहुतेक संकेतस्थळांवर नोंदणी करताना आपण युजर नेम निवडतो, ट्विटर हॅन्डल म्हणजेच ट्विटर युजर नेम. युजरनेम किंवा हॅन्डल हे आपल्या प्रोफाईलचा दुवा तयार करते. जसे की : www.twitter.com/mohinipuranik यात @mohinipuranik हे हॅन्डल आहे. जे मी केलेल्या प्रत्येक ट्विट बरोबर दिसेल.
ट्विटर हॅन्डल: महत्त्वपूर्ण तांत्रिक माहिती -
ट्विटर हॅन्डल निवडताना खालील तांत्रिक बाबींची माहिती आपल्याला उपयुक्त ठरेल.
- आपल्या खात्याचे नाव आणि ट्विटर युजर नेम ही वेगवेगळी असतात. म्हणजे आपले नाव प्रत्येक ट्विट बरोबर दिसते आणि त्यापुढे @xyzpq असे हॅन्डल दिसते
- ट्विटर नाव २० Characters किंवा त्यापेक्षा कमी लांबीचे असू शकते.
- ट्विटर Username साठी Character मर्यादा १५ इतकीच आहे. त्यापेक्षा जास्त लांबीच्या युजरनेमची नोंदणी होऊ शकत नाही.
- हॅन्डल निवडताना आपण A-Z व 0-9 अशी Alphanumeric Characters निवडू शकतो. याशिवाय spaces किंवा इतर चिन्हे वापरता येत नाही. फक्त एका चिन्हाचा या नियमाला अपवाद आहे, ते म्हणजे underscores (_) हे आपण हॅन्डलच्या सुरुवातीला, मध्ये किंवा शेवटीसुद्धा वापरू शकतो.
- ट्विटर युजरनेम निवडताना अजून एक महत्त्वाची मर्यादा म्हणजे आपण Twitter किंवा Admin हे शब्द युजरनेम मध्ये ठेऊ शकत नाही. हे शब्द ट्विटरच्या अधिकृत खात्यांसाठीच आहेत.
- बहुतेक सर्व संकेतस्थळांवर युजरनेम किंवा ईमेल पत्ता नोंदणीनंतर बदलता येत नाही. पण ट्विटर वर आपण आपले नाव, युजर नेम आणि ईमेल पत्ता सहज बदलू शकतो.
- आपण निवडलेले युजरनेम आधीच कोणी घेतले असेल, ट्विटर तशी सूचना देते, त्यावेळी आपण दुसरे युजरनेम निवडू शकतो किंवा Underscore (_) वापरून तीच अक्षरे असलेले युजरनेम घेऊ शकतो. जसे की, आपल्याला @xyzpqr हे हॅन्डल हवे आहे, पण ते उपलब्ध नाही, मग आपण @_xyzpqr असे करू शकतो, किंवा @xyz_pqr करू शकतो.
- जी खाती Suspend किंवा Deactivate झालेली असतात त्यांची युजरनेम्स पण लवकर उपलब्ध होत नाहीत.
ट्विटर हॅन्डल कसे सेट करावे किंवा बदलावे:
ट्विटर मध्ये लॉग इन केल्यावर गियर चिन्हावरून Settings मध्ये जा. आणि Account वर टिचकी देऊन Username असे लिहिलेल्या रकान्यात आपल्याला हवे ते युजरनेम टंकित करा. बदल जतन करा.
व्यावसायिक ट्विटर हॅन्डल निवडण्यासाठी टिप्स:
- ट्विटर आपल्याला १५ characters पर्यंत हॅन्डल ठेवण्याची परवानगी देत असले तरी त्यापेक्षा छोटे आणि सोपे युजर नेम असणे उपयुक्त असते. याचे कारण असे की, ट्विटरवर आपण फक्त १४० Characters वापरू शकतो, त्यात बऱ्याचदा Hashtags असतात, बऱ्याचदा दुवे असतात किंवा आपण कोणाला Tag केलेले असू शकते. आपले युजरनेम जर पूर्ण १५ characters चे असले तर ते असे दिसेल : @abcdefghijklmno बरेच लांब वाटते न? आपल्याला कोणी tag केल्यास किंवा उत्तर (@reply) दिल्यास त्यांना पण ट्विट छोटी ठेवावी लागेल. बऱ्याचदा ट्विटर युजर्स RT लिहून त्यापुढे ज्या व्यक्तीची ट्विट रीट्विट करायची त्यांचे लिहून ट्विट करतात. त्यांना लांब हॅन्डलमुळे हे त्रासदायक ठरू शकते. लक्षात ठेवण्यासही ते कठीण ठरू शकते. आपल्या नावाचे अथवा कंपनी नावाचे स्पेलिंग खूप मोठे असल्यास आपण a, e, i, o, u यापैकी काही अक्षरे वगळू शकतो. कारण ही अक्षरे वगळली, तरी निर्माण होणारा शब्द सहसा मूळ शब्दासारखाच वाचला जातो. वैयक्तिक नावाच्या बाबतीत हे कदाचित कठीण ठरेल, सर्व देशांतल्या विविध भाषा बोलणाऱ्या लोकांना आपले नाव नीट कळू शकणार नाही. पण कंपनी नावाच्या बाबतीत अशी शब्दयोजना नक्कीच उपयोगी ठरेल.
- आपले स्वत:चे किंवा व्यवसाय असल्यास कंपनीचे वा अधिकृत संकेतस्थळाचे वा अधिकृत ईमेलचे स्पेलिंग घेतले त्याचे खूप फायदे होऊ शकतात. आपले खरे नाव - खरी प्रतिमा यामुळे ट्विटरसारख्या व्यापक सोशल नेट्वर्किंग साईटचा आपल्या खऱ्या अर्थाने उपयोग करून घेता येतो. आपण Branding साठी सर्व सोशल साईट्सवर एकच पत्ता ठेऊ शकतो. कोणाला फोलो करायचे असल्यास त्यांना एकच युजरनेम लक्षात ठेवून आपल्या कंपनीच्या सर्व प्रोफाईल्सना फोलो करता येऊ शकते. त्यामुळे फोलोअर्स लवकर वाढतात. या नीतीमुळे आपले ट्विटर खाते सर्च इंजिन मध्ये अगदी वरच्या क्रमांकावर येऊ शकते. आपली सर्व सोशल प्रोफाईल्स व अधिकृत संकेतस्थळ यांचे स्पेलिंग एकंच असल्यास शोध परिणामांमध्ये पहिल्या पानावर आपल्याच कंपनीचे अधिकाधिक परिणाम दिसू शकतील. त्यामुळे आपण अजून नवीन व्यवसायाची सुरुवात करीत असाल, तर ही नीती अवश्य लक्षात घेऊनच सर्व नावे निवडा.
- Offline मार्केटिंगसाठीही छोटे, सोपे युजरनेम जाहिरातींमध्ये छोट्या अक्षरात दिले तरी लक्षात राहते आणि जाहिरात बधून आपले online फोलोअर्स आणि पर्यायाने ग्राहक लवकर वाढतात.
- शक्य असल्यास ट्विटर हॅन्डलमध्ये आपल्या व्यवसायासंबंधी SEO Keyword अवश्य घ्यावा. त्यामुळे संबंधित शोध परिणामांमध्ये आपले ट्विटर खाते वरच्या क्रमांकावर दिसण्याची शक्यता वाढते.
- असभ्य व दुखावणारे शब्द युजर नेम म्हणून निवडू नये. बरेच युजर्स खोटे अस्तित्व निर्माण करतात, त्यामुळे काही लोकांना असे नाव असण्यात गैर वाटत नाही. पण आपण चांगल्या ट्विट करीत असलो तरी केवळ चुकीच्या युजर नेम मुळे लोक फोलो करणे, रीट्विट करणे, उत्तर देणे, मेन्शन करणे टाळू शकतात.
- ट्विटरवर एकदा निवडलेले युजरनेम बदलता येते. त्यामुळे मनासारखे हॅन्डल नाही घेतले गेले तर पुन्हा दुसरे घेता येते. पण वारंवार सहज युजरनेम बदलले त्यामुळे फोलोअर्स, मित्र गोंधळात पडू शकतात. SEO च्या दृष्टीने पण ते ठीक नाही.
- युजरनेममध्ये अंक वापरणे सुद्धा SEO मानांकनाच्या दृष्टीने फारसे उपयुक्त नसतात.
यामुळे आपले ट्विटर हॅन्डल विचार करून निवडा. मित्रांशी, सहकाऱ्यांशी चर्चा करून ठरवा आणि १४० अक्षरांच्या या विशाल जगात स्वत:चा ठसा निर्माण करा. हा लेख आवडल्यास आपल्या मित्रांशी शेयर अवश्य करा.
0 comments:
Post a Comment