ग्रेव्हयार्ड लिटरेचर - प्राजक्त देशमुख
ग्रेव्हयार्ड , कबरस्थान हीच ज्यांनी खेळाची जागा बनवली अशा मुलांच्या भावविश्वाची ही एक वेगवान भन्नाट सफ़र आहे. या कविता शब्दच असल्या तरी त्या शब्दांपलिकडे बरंच काही आहे. कशाने तरी झपाटल्यागत या कविता लेखणीतून उतरलेल्या आहेत. नाशिकच्या या कवीने स्वतः कधीच कबरस्थान पाहिलेलं नाही. अशा वेळी एखाद्या अदृश्य योनीच्या प्रभावाखाली उमटलेल्या वाटाव्यात अशा या कविता. खोलात उतरू पहाणार्याला गवसेल असं खूप काही त्यांत आहे. प्रियजनांच्या मृत्युबरोबरच अनोळखी जुन्या काळात मरण पावलेल्या व्यक्तींच्या मृत्युचं जणू तांडवच त्या मुलांच्या मनात सैराटपणे घोंघावत आहे. आणि एकूणच जीवनाच्या एका अंधार्या कोपर्याशी त्यांची चाललेली कुजबुज इथे हलक्या आवाजात जाणवते आहे. या कविता फ़िलॉसॉफ़िकल असल्याचा कसलाही आव आणत नाहीत. पण त्या अबोध मुलांच्या माध्यमातून बोलणारा प्राजक्त देशमुख नावाचा फ़िलॉसॉफ़र ज्याला जाणवला त्यालाच या कवितांचा गाभा सापडेल. या कविता मेंदूचा आजवर न पाहिलेला एक कप्पा दाखवतील. एका नव्या गूढ प्रतलात नेतील. प्राजक्तच्या या ग्रेव्हयार्ड लिटरेचर मध्ये नाट्य आहेच. काव्य आहेच. पण एक वेगवान गूढ चित्रपटही लपलेला आहे. तो उलगडावा आणि त्यामागचं भावविश्व वाचकाला नवीन प्रश्न उभे करायला भाग पाडावं हीच आमची अपेक्षा आहे. भारती सरमळकर यांनी या चित्रपटातले सिनॉप्सिस वाटावेत असे दृश्य परिणाम साधत हे पुस्तक उभारलं आहे. मंदार चोळकर यांनी त्याला नेमकं मुखपृष्ठ जोडलं आहे. सारंच काम एका वेगळ्या तरल भावविश्वाच्या पातळीवर जमून आलंय . वाचकालाही या विश्वाची अनुभूती येईलच.

0 comments:
Post a Comment