300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Thursday, 25 March 2010

Tagged under: , ,

मला आवडलेलं मराठी व्यक्तीमत्व - डॉ. श्रीधर राजगुरु आणि सौ. अनिता राजगुरु



नेटभेट तर्फे आयोजित करण्यात आलेल्या "मराठी भाषा दिवस" स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक विजेता लेख


महाराष्ट्र बालकुमार संमेलनाच्या समारोप जवळ आला. नुसते वंदेमातरम न म्हणता एक अप्रतिम कार्यक्रम सादर झाला. साहित्यीकांच्या हातातल्या मेणबत्तीच्या ज्योतीवर सर्व कार्यक्रमातल्या मुलांनी ज्योत पेटवली आणि ही ज्ञानज्योत भारतभर नेली म्हणजेच प्रातिनिधिक स्वरुपात मंचावर नकाशा ह्या मेणबत्त्यांनी उजळला. एका कोपर्‍यात तिरंग्याच्या तीन रंगांचा ओढण्या घेतलेल्या मुलींनी ३ ओळीत उभं राहुन अशी हालचाल केली की झेंडा वार्‍यावर लहरतोय असा भास झाला. मागे वंदेमातरमचा ईतिहास, त्याची महती सांगणारं निवेदन, हा समारोप इतका उत्कट होता की मंडपातला प्रत्येकजण देशप्रेमाने प्रेरीत झाला. ह्या कार्यक्रमाचे सूत्रधार, संकल्पक कोण ? तर ते होते डॉ. श्रीधर राजगुरु आणि सौ. अनिता राजगुरु (आण्णा आणि काकू)

आण्णा आणि काकू हे माझ्या सुनेचे सख्खे मोठे काका-काकू. आपल्या आजुबाजुला वावरणारी माणसं एवढी मोठी, अफाट ज्ञानी आणि एका ध्येयाने प्रेरीत होउन त्यासाठी झटणारी असतात हे त्यांच्या जेव्हा संपर्कात येतो, जवळ येतो तेव्हा त्यांचं मोठेपण प्रकर्षाने जाणवतं. त्यामागचे त्यांचे कष्ट, शिक्षणाच्या द्वारे नाटकांच्या द्वारे , शिबिरांच्या द्वारे , खेळांच्या द्वारे व्यक्तीमत्व विकास या सार्‍याची तळमळ अधिक जाणवू लागते. एकाच ध्येयाने झपाटून गेलेली ही जोडी लहानग्यांत जशी प्रसिद्ध आहे तशीच नाट्यप्रेमी जगतातही आहे.

आण्णांचं मूळ आडनाव ब्रम्हे. कर्‍हाड जवळच्या सासवड या गावी त्यांचे पुर्वज कचेश्वर महाराज रहात. दुष्काळाच्या वेळी ते गरुडासनात दीड दिवस उभे राहिले, धो धो पाऊस पडला म्हणून शाहूमहाराजांनी त्यांना गावं इनाम दिली आणि राजगुरु हा किताब दिला. भगतसिंग, सुखदेवांचे सहकारी राजगुरु हे अण्णांचे काका.

अशी थोर पार्श्वभुमी त्यांना लाभली. पण ते रमले लहान मुलांच्यात. आण्णांनी दुसरीत असताना शाळेच्या नाटकात वक्रतुंडाची भुमिका केली जिथून त्यांचे रंगभुमीवर आगमन झाले. त्यांनी लहान मुलांसाठी "चिल्ड्रन थीएटर" चालु केलं. संगीतचंद्राचे वरदान, अटकम पिटकम छिन्नुक छिट्या, आजीची छडी गोडगोड छडी, पुस्तक हंडी, चंद्र हवा- चंद्र हवा अशी अनेक नाटके दिग्दर्शीत केली. मोठ्यांसाठी ज्योती, सोनेरी चौकट, स्वामी, काका किशाचा, कुलवधु, तीन चोक तेरा अशी १२ नाटके  दिग्दर्शीत केली.

१९६५ मध्ये अण्णांचं लग्न झालं आणि सौ. अनिताकाकूंनी पण स्वतःला त्यांच्या कार्यात झोकुन दिलं. अण्णा एम.ए., एम्.एड्,डी पी एड, पी.एच्.डी. तर काकू एम.ए, एम.एड, डी.पी.एड असा समसमा संयोग. नाट्यप्रेमींच्या जेवणखाणांचं बघता बघता काकू एकीकडे पी.ई.एस गर्ल्स स्कूल, पुणे येथे सुपरवायझर म्हणून नोकरी करत होत्या."शब्दांच्या जाती परीचयातून वाक्यरचनेकडे " या निबंधांला त्यांना अखिल भारतीय पुरस्कार मिळाला. त्यांनी दूरदर्शनसाठी लेखन, गीतापरीवारासाठी वर्तमानपत्रातील कात्रणांच्या चिकटवह्या केल्या. नाट्यवाचन स्पर्धेत बक्षीसे, त्यांचे शिशुरंजनतर्फे आयोजित व्यक्तीमत्व विकास व नाट्य शिबिरांचे संचलन १९६७ पासून आजतागायत चालू आहे. अनुत्तीर्ण मुलींसाठी ईंग्रजीचा प्रकल्प काकूंनी राबवला, तो इतका यशस्वी झाला की श्री अमरेंद्र गाडगीळांनी (ईंडीयन इन्स्टीट्युटचे) दिल्लीला पाठवला व त्यास राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. अशा ह्या आण्णांच्या अर्धांगिनीने काकूंनी २८ पुस्तके लिहीली.

१९८८ साठी आण्णा नवरोसजी वाडीयामधुन सेवानिवृत्त झाले आणि दोघेही दुप्पट उत्साहाने कामाला लागले. त्यांना वाढत्या वयाचा व काकूंना कर्करोगाचा कधीही अडसर वाटला नाही. २००२ मध्ये बालदिनी आण्णा शाळेत न जाणार्‍या मागासवर्गीय मुलांना (ज्यांनी गाडीपण पाहिली नव्ह्ती) घेऊन दिल्लीला गेले. वाजपेयींच्या समोर मुलांनी वंदेमातरम असं सादर केलं की अटलजींच्य डोळ्यात पाणी आलं.

संगमनेरचे तरुण उद्योजक व पुढची भावी पिढी सुसंस्कृत होण्यासाठी धडपडणारे संजय मालपाणी या दोघांना संगमनेरला घेऊन गेले. "भारताचं भविष्य मुळीच दारुण नाही. खेड्यापाड्यातून कार्यकर्ते ताकदीने कार्य करीत आहेत हे पाहून उत्साह येतो." असं दोघांच म्हणंण आहे. विविध स्पर्धा घेऊन मुलांना टी.व्हीच्या व्यसनापासून लांब ठेवता येतं.

१९६९ मध्ये आण्णांची शिशुरंजन संस्था स्थापन झाली आणि फक्त नाटक हे उद्दीष्ट न राहता व्यक्तीमत्व विकास करण्याचं व्रत त्यांनी घेतलं. १९५२-७३ या काळात पी.डी.ए. या सुप्रसिद्ध संस्थेत आण्णा कार्यरत होते.
 वेड्याचे घर उन्हात , प्रेमा तुझा रंग कसा?, तू वेडा कुंभार अशा अनेक नाटकांचे भालबा केळकर दिग्दर्शक होते आणि आण्णा रंगमंच व्यवस्थापक. "तू वेडा कुंभार" साठी उत्कृष्ट नेपथ्याचा राज्यपुरस्कारही त्यांना मिळाला. नेपथ्य खरे वाटावे म्हणून काकूंनी शेणाने भिंतीपण सारवल्या.

२५ मार्च १९७३ या दिवशी पी.डी.ए मधून विभक्त व्हावं लागल्याने मोहन आगाशे, डॉ. जब्बार पटेल, सतीश आळेकर आणि आण्णा या मंडळींनी थीएटर अ‍ॅकॅडमी ही संस्था स्थापन केली व इतिहास घडविणार्‍या "घाशीराम कोतवाल" ची मुहुर्तमेढ रोवली. ह्या चर्चा, वादळं, जेवणं आण्णांच्या घरीच चाले कारण संस्थेला वेगळी जागा नव्हती. १० बॅगा घेऊन ही मंडळी जगभर हिंडली. "घाशीराम्"चे निर्मीती व्यवस्थापक असलेले आण्णा पुन्हा शिशुरंजन शिबिरात रंगून गेले. या नाटकासंदर्भात मधु अभ्यंकर लिहितात "पुण्याचा वामन हरी, साहेबदेशी धमाल करी !" जर्मनी व फ्रांन्सचे रसिकही या नाटकावर खुष होते.

१४.११.२००३ रोजी सोलापुरात बालशिक्षण परीषदेच्या दहाव्या राज्यव्यापी अधिवेषनाचे उदघाटन आण्णांच्या हस्ते झाले. ते म्हणतात, "जो चांगले मूल होऊ शकतो तोच चांगला शिक्षक होऊ शकतो".
आण्णांनी प्रोग्रेसीव्ह ड्रॅमॅटीक असोसिएशन, थीएटर अ‍ॅकॅडमी सारख्या संस्थात संस्थापक व कार्यवाह म्हणून  काम केलं. "मराठी बालरंगभूमी संहिता व प्रयोग दर्शन" ह्या विषयांवर प्रबंध लिहिला व त्यांना १९९१ मध्ये PHD मिळाली. अनेक चित्रपटांतून कामे केली, नाटकातून भूमिका केल्या. उंबरठा, गंगाकाठ, गंगेत घोडे न्हाले, अंगुठा छाप ह्या मराठी, हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन सहाय्याचे काम केले. अनेक शिबिरं, अनेक मेळावे, वंदेमातरमचे दृष्याविष्कार सादर केले. अजूनही वयाच्या ८२ व ८० व्या वर्षी दोघेही "अथश्री"त दासबोध वाचन, कार्यक्रमांचे आयोजन, चित्रासहित दिनविषेश सादर करतात. दोघांचही काम एवढं मोठं आहे कि लिहावं तेवढं कमीच आहे. दुधात साखर विरघळावी तसं हे दोघांच अतूट नातं.

या सगळ्याची जाणीव ठेवून २८ ते ३१ जानेवारी २०१० ला संगमनेर येथे झालेल्या २२ व्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनात "जीवन गौरव पुरस्कार"  देउन आण्णांना गौरविण्यात आले. सकाळचे संपादक सुरेशचंद्र पाध्ये म्हणतात, " लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना, वेशभूषा, चित्रपट ह्या क्षेत्रातील त्यांचे काम धडाकेबाज आहे".

अशा या जोडीला माझ्या लाख लाख शुभेच्छा !

नीला सहस्रबुद्धे, पुणे 


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

0 comments:

Post a Comment