शक्ति आणि बुद्धि हे दोन्ही गुण एकत्र एका व्यक्तिमध्ये फार क्वचितच आढळून येतात. स्वा. विनायक दामोदर सावरकर ही अशी एक व्यक्ती होवून गेली, जिच्या व्यक्तिमत्वात हे दोन्ही गुण ठायी ठायी दिसून येतात, म्हणूनच मलासावरकर खूप आवडतात.
२८ मे, १८८३ या दिवशी नाशिक जिल्ह्यातील ‘भगूर’ या गावात सावरकरांचा जन्म झाला. वयाच्या नवव्या वर्षी आई राधाबाई यांचे निधन झाले. त्यांचे वडील दामोदरपंत गणेश म्हणजेच बाबाराव, विनायक आणि नारायण या आपल्यामुलांना रामायण , महाभारतातील कथा, रामविजय, हरिविजय, वामन पंडित, होमर यांची काव्ये वाचून दाखवीत असत. शिवाजी, राणाप्रताप आणि पेशव्यांच्या बखरी व पराक्रमांचे पोवाडे यांची माहिती देत असत. यातुनच विनायकाचेबालमन घडत होते. विनायकाने वयाच्या १४व्या वर्षी देशाच्या स्वातंत्र्यासाठी घरातील अष्टभूजा देवीपुढे ‘मी या देशाचे स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी मारिता मारिता मरेतॊ झुंझेन’ अशी सशस्त्र क्रांतीची शपथ घेतली. या घटनेचे मूळआई-वडिलांच्या आदर्शात व त्यांच्याकडुन होणार्या संस्कारांमध्ये दडलेले होते असे दिसून येते.
विनायकाने कथा, कविता, इतिहास, निबंध, इ. सगळ्या विषयांची पुस्तके लहानपणीच वाचून काढली. त्याच्या बुद्धिला कोणताही विषय कठिण वाटतच नसे. वयाच्या दहाव्या वर्षी त्याच्या कविता पुण्याच्या पसिद्ध वृत्तपत्रातून पसिद्ध होऊलागल्या. त्याची बुद्धि अलौकिक व प्रतिभा अवर्णनीय होती. तसेच शारीरिक दृष्ट्या कमकुवत राहता कामा नये यासाठी विनायक सूर्यनमस्कार व इतर व्यायाम करू लागला. कुस्ती करणे, नदीवर पोहायला जाणे, आपापसात दोन गटकरून लढाईचा खेळ खेळणे, जोर बैठका यामधेही विनायक तितकाच रममाण होई. बुद्धिबरोबर त्याने अशी शक्ति चीही कांस धरली.
मॅट्रिकची परीक्षा उतीर्ण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी सावरकरांनी पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. नाशिक येथे सुरु केलेले स्वातंत्र्यजागृतीचे काम त्यांनी पुण्यातही सुरु केले. लोकमान्य टिळकांच्या उपस्थितीत पुण्यातमॊठ्या प्रमाणावर विदेशी कपड्यांची होळी केली. महाविद्यालयात शिकत असतानाच पोवाडे रचले, शेकडो लेख लिहीले. त्यांचे ‘अभिनव भारत’ या गुप्त क्रांतिकारीसंस्थेचे कार्य त्यांनी चालू ठेवले. हे सगळं करत असताना सावरकरांनीअभ्यासाकडे अजिबात दुर्लक्ष हॊऊ दिले नाही. २१ डिसें.,१९०५ ला ते बी.ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले. वकिलीच्या पहिल्या परीक्षेत यश मिळवून दुसर्या वर्षाचा अभ्यास मुबईत सुरु हॊता. प्रखर देशभक्त असलेल्या लंडनस्थित शामजी कृष्णवर्मायांनी बुद्धिमान, देशभक्त तरुणांसाठी शिष्यवृत्ती घोषित केल्या हॊत्या. लॊकमान्य टिळकांनी स्वतः सावरकरांना शिफारसपत्र दिले आणि ‘बॅरिस्टर’ हॊण्यासठी म्हणून शिष्यवृत्ती घेवून सावरकर लंडनला पॊहॊचले. वयाच्या अवघ्या २३व्यावर्षी.
बॅरिस्टर तर त्यांना व्हायचे होतेच पण अंतःस्थ हेतू होता शत्रूच्या घरात शिरून शत्रूला मारायचे. इंग्लंडमधिल मुक्कामात त्यांनी विविध पातळीवर इतके विलक्षण काम केले आहे की त्याला तोडच नाही. भाषणे, चर्चा यामधून भारतीयतरूणांमध्ये सशस्त्र क्रांतीची बीजे पेरली. शस्त्रास्त्रे जमवणे, बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण, गुप्त पत्रके काढणे, लेख लिहीणे, भारतातून येणार्या तरूणांशी संपर्क करून त्यांना आपल्या कार्यात ऒढणे अशा अनेक कार्यात त्यांचा पुढाकार हॊता.इंग्रज १८५७ च्या स्वातंत्र्याच्या उठावाला ‘शिपायाचे बंड’ असे संबोधून, हे बंड इंग्रजांनी कसे मॊडून काढले असा खॊटा इतिहास प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करत होते. खरे तर तात्या टोपे, झाशीची राणी अशा अनेक वीरांनी या उठावात लढादीला हॊता. सावरकरांनी ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हे पुस्तक लिहीले. मराठीत एवढ्या जहल भाषेत लिहीलेले पुस्तक छापायला हिंदुस्थानात कोणी तयार नव्हते. म्हणून त्याचे इंग्रजीत भाषांतर करण्यात आले. खूप प्रयत्नांनंतर हॉलंडमध्येते छापण्यात आले. पण प्रकाशनापूर्वीच त्यावर बंदी घालून त्याच्या प्रति जाळण्यात आल्या. परंतु एक लेखी प्रत मादाम कामा यांनी स्वतःजवळ जपून ठेवल्यामुळे नंतर परत हे पुस्तक प्रकाशित करता आले. तसेच लंडनमधे असतानासावरकरांनी ‘मॅझिनीचे चरित्र’ लिहिले. त्या मॅझिनीला सावरकरांनी ‘इटलीचा रामदास’ असे संबोधले आहे. यावरून त्याच्या कार्याची आपल्याला कल्पना येते.
मे, १९०९ मध्ये सावरकर बॅरिस्टर परीक्षा उत्तीर्ण झाले परंतु इंग्रज सरकारने त्यांना पदवी देण्यास नकार दिला. याची अनेक कारणे आहेत. लंडनमध्ये मदनलाल धिंग्रा यांनी कर्झन वायली या इंग्रज अधिकार्याला गोळ्या घालून ठार मारले.इग्लंडमध्ये एका भारतीय तरूणाने एका इंग्रज अधिकार्याला मारले हा मोठा पराक्रमच होता. मदनलालच्या या कृतिमागे सावरकरांचाच हात हॊता. भारतात सुद्धा इंग्रज सरकारच्या विरोधात कटाच्या अनेक घटना घडत होत्या. नाशिकच्याकटात सावरकरांचे अनेक बालमित्र पकडले गेले हॊते. त्यांचे वडीलबंधू गणेश सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा झाली, लहानभाऊ नारायण सावरकर यांनाही सरकारने पकडले होते. या सगळ्याच्या मुळाशी विनायक सावरकर आहेत अशाबातम्या इंग्रजांकडे असल्याने त्यांच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्यात आले.
फ्रान्सहून परत येताना इंग्रज सरकारच्या पोलिसांनी सावरकरांना अटक केली. सावरकरांवर हिंदुस्थानात राजद्रॊह केल्याचा आरॊप ठेवून तेथे खटला चालवण्यासाठी त्यांची रवानगी हिंदुस्थानात केली गेली.
१ जुलै, १९१० यादिवशी सावरकर हिंदुस्थानात परत येण्यासाठी ‘मॊरिया’ बॊटीत बसले. त्यांच्यावर रात्रंदिवस डॊळ्यात तेल घालून दोन इंग्रज पहारेकरी लक्ष ठेवून हॊते. सावरकरांच्या डॊक्यात इथुन कसे निसटता येइल हाच विचार चालूहोता. मोरिया बोट मार्सेलिस बंदरात यांत्रिक बिघाडामुळे काही काळ थांबली होती. सावरकरांनी बोटीचे निरीक्षण करून ‘पोर्ट हॊल’ मधून पसार हॊण्याचा निश्चय केला होता. अनायासे बोट इथे थांबली आहे, जर आपण इथुन पॊहत जावूनफ्रान्सचा किनारा गाठला तर आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार इंग्रज अधिकारी आपल्याला पकडु शकणार नाहीत. या सगळ्या गोष्टींचा त्यांनी व्यवस्थित अभ्यास केलेला होता. ८ जुलै, १९१० रोजी शौचकूपात जावून तिथल्या काचेच्यादरवाज्यावर स्वतःचा अंगरखा ठेवला त्यामुळे बाहेर उभ्या पहारेकर्यांना आतल्या हालचाली दिसणार नाहीत. खरचटण्याची, ऒरखड्यांची व चामडी सॊलवटण्याची पर्वा न करता त्या अथांग सागरात सावरकरांनी उडी मारली. पॊहत पॊहतते फ़्रान्सच्या किनार्यावर पॊचले देखिल पण इंग्रज शिपायांच्या लालचीला बळी पडून फ्रान्सच्या पॊलिसांनी त्यांना इंग्रजांच्या स्वाधीन केले.
वरील घटनेचा अभ्यास केला असता काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. एक म्हणजे समुद्रात उडी घेवून किनार्यापर्यंत पॊहत पॊहत पोचायचे हा निर्णय घेणे हे दुबळ्याचे काम नाही, यासाठी प्रचंड शारीरिक शक्ति आणि मनाचा निर्धार लागलाअसणार. दुसरी गोष्ट कायद्याचा व्यवस्थित अभ्यास आणि त्याचा अचुक वापर करण्याची बुद्धि. त्यांच्या याच गोष्टी मला खूप आवडून जातात. काही वेळा असेही वाटते योगसामर्थ्याने ‘लघिमा’ ‘गरिमा’ सारख्या योगसिद्धि तर त्यांना प्राप्तनव्हत्या? कारण, त्या एवढ्याश्या भोकातून सगळा देह बाहेर काढणे खरोखर आश्चर्यजनकच आहे.
सावरकराची ही उडी पाहून एक कवी म्हणतात,
कर्तव्य मृत्यु विस्मरला ।
बुरूजावर फडफडलेला ।
झाशीचा घोडा हसला ।
वासुदेव बळवंताच्या ।
कंठात हर्ष गदगदला ।
दमोदर डोले वरला ।
मदनलाल गाली फुलला ।
कान्हेरे खुदकन हसला ।
क्रांतीचा केतू वरला ।
अस्मान कडाडून गेला ।
दुनियेत फक्त आहेत ।
विख्यात बहाद्दूर दोन ।
जे गेले आईकरिता ।
सागरास पालांडून ।
हनुमंता नंतर आहे ।
या विनायकाचा मान ।
भारतात आल्यावर मुंबईत विशेष न्यायालय निर्माण करून सावरकरांवर इंग्रज सरकारने खटला चालवला. तसेच नाशिक कटाच्या दुसर्या खटल्याचे कामकाजही सुरू होतेच. दोन्ही खटल्यांचा निकाल लागला आणि सावरकरांना दोनजन्मठेपेची म्हणजे ५० वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. हे ऐकून सुद्धा या वीराच्या प्रसन्नतेत काहीच फरक पडला नाही. उलट एक इंग्रज अधिकारी जेव्हा त्यांच्याशी कुत्सितपणे त्यांच्या या ५० वर्षे शिक्षेबद्दल बोलला तेव्हासावरकरांनीच त्याला प्रतिप्रश्न विचारला, ‘ब्रिटिश सरकार तरी इथे अजुन ५० वर्षे टिकणार आहे का?’
सावरकरांची ही भविष्यवाणी खरोखरच खरी ठरली.
काळेपाणी म्हणजे अंदमान. अत्यंत विषम हवामान, जंगल, चिखल आणि घाण, डास आणि जळवांचा प्रचंड त्रास यासगळ्यासाठी अंदमान प्रसिद्ध हॊते. सावरकरांचा हा कारावास म्हणजे अतॊनात मानसिक तसेच शारीरिक छळ, प्रचंड कष्टआणि त्यानी दाखवलेल प्रचंड धैर्य तसेच त्यांचे प्रेरक कार्य यांचा रोमांचित करणारा इतिहास होय. या काळ्या पाण्याच्या शिक्षेत काथ्या कुटुन हात रक्तबंबाळ झाले. तेलघाण्याला जुंपल्याने अनेक वेळा ते मुर्च्छित झाले. सकाळी ७ तेसंध्याकाळी ४ या वेळात सलग सात दिवस त्यांना हातकडीची शिक्षा भोगावी लागली. अशा यमयातना सहन करून सुद्धा सावरकर हिम्मत हरले नाहीत. अंदमानातला अमानुष छळ, वाचायला काही नाही, बोलायला काही नाही, शरीरथकवणारे काम आणि रूक्ष जेवण या सगळ्या गोष्टी इतक्या भयंकर होत्या की उल्हासकर दत्त नावाचा बंदी वेडा झाला, इंदुभूषणने आत्महत्या केली. सावरकरांनी धैर्य खचु लागलेल्या अनेक कैद्यांना धीर देण्याची व उमेद वाढवण्याचीकामगिरी केली. ते कैद्यांना म्हणत, ‘घाबरू नका. एक दिवस असा उगवेल, की याच कारागृहात तुमचे पुतळे उभारले जातील आणि अंदमान हे भारतीय यात्रेकरूंचे महन्मंगल तीर्थक्षेत्र होईल.’
असं वाटत की सावरकर खरोखरच भविष्यवेत्ते होते की काय?
अंदमानात सावरकरांनी शुद्धिकार्यही केले. अनेक बाटवलेल्या हिंदूना त्यांनी पुन्हा हिंदू धर्मात घेतले. अंदमानच्या अशा कठिण परिस्थितीतही सावरकरांचे कविमन ताजे व टवटवित होते. त्यांनी ‘कमला’, ‘गोमांतक’ अशी अनेक काव्येबंदीशाळेत लिहिली. पण जवळ कागद नाही की पेन्सिल अशावेळी त्यांनी उषःकालच्या आभाळाला विचारले, माझा कागद हॊतॊस का? आभाळ म्हणाले,
मी मुक्तामधले मुक्त - तू कैद्यांमधला कैदी।
माझे नि तुझे व्हायाचे - ते सूर कसे संवादी?
माझ्यावर लिहिती गीते - या मंद-समीरण लहरी।
माझ्यावर चित्रित होते - गरूडाची गर्द भरारी।।
जड लंगर तुझिया पायी - तू पीस कसा होणार? माझ्याहून आहे योग्य - भूमीला प्रश्न विचार।।
आभाळ म्हणाले 'नाही' - भूमीही म्हणाली 'नाही'।
मग विनायकाने त्यांची - आळवणी केली नाही।।
पापण्यांत जळली लंका - लाह्यांपरि आसू झाले।
उच्चारून होण्याआधी - उच्चाटन शब्दां आले।
की जन्म घ्यायच्या वेळी - गंगेस हिमालय नाही।
शाई न स्पर्शली असूनी - हे अभंग नदिच्या 'बाही'।।
दगडाची पार्थिव भिंत - तो पुढे अकल्पित सरली। 'मी कागद झाले आहे - चल लिही' असे ती वदली।
- मनमोहन नातू
खरोखर ज्ञानेश्वरांनंतर भिंत पुन्हा एकदा चालली.
१९२१ साली सावरकरांची अंदमानमधून सुटका करण्यात आली त्यानंतर पुढे तीन वर्षे भारतामध्ये कैदेत होते. अखेर ६ जून १९२४ रोजी इंग्रज सरकारने त्यांना मुक्त केले. परंतू रत्नागिरी सॊडून न जाण्याचा आदेश देण्यात आला. सावरकरजवळ जवळ १३ वर्षे रत्नागिरीत स्थनबद्ध हॊते. तिथेही अस्पृश्यता निवारणाचे खूप प्रयत्न केले. रत्नागिरीत अस्पृश्यांसाठी त्यांनी ‘पतित पावन’ मंदिर बाधले.
महान समाजसुधारक विठ्ठल रामजी शिंदे यांनी सावरकरांचे समाजसुधारणेचेकाम पाहून खूप कौतुक केले, ते म्हणाले, ‘देवाने माझे उरलेले आयुष्य त्यांना द्यावे.’ सावरकर अतिषय कष्टप्रद आणि खडतर आयुष्य जगले. दम्यासारखा विकार, स्वातंत्र्यॊत्तर काळात झालेले आरॊप प्रत्यारॊप, आपल्या जीवलगांचा मृत्युअशा अनेक गॊष्टी सॊसायला लागुनही त्यांना ८३ वर्षांचे दीर्घायुष्य लाभले, नक्कीच विठ्ठलजी शिंदेंसारख्या अनेकांच्या आशीर्वादाचेच ते फळ मानावे लागेल.
सावरकरांच्या अनंत कार्यात भाषाशुद्धिची चळवळ ही अत्यंत महत्वाची मानावी लागेल. आज मराठी भाषेत प्रचलित असलेल्या अर्थसंकल्प, चित्रपट, गणसंख्या, दूरध्वनी, सेवा निवृत्त, शिरगणना,इ. अनेक शब्दांचे जनक सावरकर आहेत.स्थानबद्धतेतून मुक्तता झाल्यावर १९३७ ते १९४३ अशी सहा वर्षे सलग त्यांनी हिंदू महासभेचे अध्यक्षपद भूषविले. सावरकरांनी त्यांची हिंदूराष्ट्राची संकल्पना मांडली. त्यांनी ‘हिंदूत्व हेच राष्ट्रीयत्व’ असण्याची सिंहगर्जना केली. सावरकरांनीहिंदू या शब्दाची जी व्याख्या केली ती अशी,
आसिंधू सिंधू पर्यन्ता यस्य भारत भूमिका ।
पितृभूः पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिती स्मृतः ॥
हिंदुस्थानला १५ ऑगस्ट १९४७ रॊजी स्वातंत्र्य मिळाले. सावरकरांचा स्वातंत्र्यानंतरचा कालखंडही अनेक चांगल्या वाईट घटनांनी भरलेला आहे. त्यांचा अनेक ठिकाणी सन्मान करण्यात आला, पुणे विद्यापीठाने डी.लिट. ही सन्मान्य पदवीदिली. अनेक ठिकाणी जाहीर सत्कार करण्यात आले. परंतु त्यांचे वडीलबंधू बाबाराव सावरकर यांचे १९४५ साली, लहान बंधू बाळ सावरकर यांचे १९४९ साली, पत्नी यमुनाबाई यांचे १९६३ साली झालेले निधन त्यांना फार दुःख देवून गेले.मातृभूमीच्या चरणी सर्व कुटंबच देशसेवेसाठी समर्पित झाल्याचे इतिहासात दुसरे उदाहरण नाही.
आत्मसमर्पण करण्याचा निश्चय करून सावरकरांनी अन्न घेण्याचे सोडले. शेवटच्या २० दिवसात तर पाण्याशिवाय त्यांनी काहीही घेतले नाही. अखेर २६ फेब्रुवारी १९६६ ला दुपारी ११वा.३० मिनिटांनी त्यांनी देह ठेवला.
एकाच वाक्यातत्यांच्याबद्दल बॊलायचे झाल्यास ‘झाले बहु, हॊतीलही बहु पण यासम हाच!’ या समर्थ शब्दातच त्यांचे वर्णन करावे लागेल.
सोनाली केळकर
सदर लेख नेटभेट तर्फे आयोजित करण्यात आलेल्या "मराठी भाषा दिवस" या स्पर्धेसाठी सोनाली केळकर, ठाणे यांनी पाठविला आहे.
0 comments:
Post a Comment