लहानपणी शाळेत "एका वाक्यात उत्तरे द्या" असा प्रश्न परीक्षेत येत असे. तेव्हा हमखास मार्क्स मिळवुन देणारा हा प्रश्नप्रकार आवडायचा, जवळचा वाटायचा. त्याच धर्तीवर मी मित्रांबरोबर पुन्हा "एका वाक्यात उत्तरे द्या" हा खेळ खेळायचं ठरवलं (असे गमतीशीर प्रयोग करायला मला खुप आवडतं !). फरक एवढाच की प्रश्न वेगळे होते, कोणत्याही पुस्तकातील नव्हे तर जीवनातील खरेखुरे प्रश्न होते.
खरं सांगतो तुम्हाला, माझ्या मित्रांना आणि मला स्वतःला देखिल या प्रश्नांची उत्तरे आली नाहीत. प्रश्न कठीण होते असेही नाही किंवा उत्तरे येत नव्हती असेही नाही. पण येणारी उत्तरे एका वाक्यात मावणारी नव्हती.
हा प्रश्नोत्तराचा खेळ मला एक मोलाचा विचार देउन गेला. "एका वाक्यात उत्तरे द्या" हा प्रश्नप्रकार एक गोष्ट शिकवतो ती म्हणजे "फोकस" (Focus). कोणत्याही प्रश्नाला केवळ एकच बरोबर उत्तर असु शकते ही शिकवण. ती जर अंगी बाणवली तर "जर्-तर", "पण - परंतु- किंवा" या संकल्पना मागे पडतात. म्हणुनच आयुष्यातल्या या काही प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात किंवा शब्दात देता येणे महत्वाचे असते. आणि तसे असेल तर जीवनाचे उद्दीष्ट साध्य करणे सोपे होते.
बघा तुम्ही पण प्रयत्न करुन या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला येतात का ते!
- तुमच्या जीवनात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे?
- तुमची यशाची संकल्पना काय आहे?
- तुमची सुखाची व्याख्या काय आहे?
- जर तुमचे आयुष्य कोण्या एका व्यक्तीसारखे घडवण्याची संधी देवाने दिली तर तुम्ही कोणती व्यक्ती निवडाल?
- तुमची ओळख कोणाशी करुन द्यायची असेल तर ती एका वाक्यात कशी करुन द्याल?
- तुमच्या मित्रांना तुमचे वर्णन एका वाक्यात करायला सांगीतले तर ते कसे करतील?
- तुमच्या जीवनाचे उद्दीष्ट काय आहे (किंवा काय असावे) असे तुम्हास वाटते?
- आपल्या उपरोक्त जगाने आपल्याबद्दल काय म्हणावे अशी तुमची इच्छा आहे?
या आठ प्रश्नांची उत्तरे ज्यांच्याकडे तयार असतील त्यांनी आपण उचित मार्गावर चाललो आहोत असे समजावे. आणि ज्यांना (माझ्यासारख्या) या प्रश्नांची उत्तरे माहीत नसतील त्यांनी आजच आपापल्या उत्तरांचा शोध सुरु करावा. त्याशिवाय यशाचा मार्ग खुला होणार नाही.
एखाद्या प्रश्नावर तुम्ही कदाचीत अडकाल. एक निश्चीत उत्तर ठरवणे शक्य होणार नाही. अशावेळेस काय उपाय करावा ते सांगतो. (मला आलेल्या एका SMS मध्ये हा उपाय सांगीतला होता.)
जर दोन पर्यायांपैकी एक निवडायचा असेल तर नाणेफेक करावी. उत्तर नाणे पडल्यानंतर
मिळत नाही तर नाणे हवेत असताना तुम्ही ज्याच्याबद्दल विचार करत असता तो पर्यायच
तुमच्या मनाचे "उत्तर" असतो.
(नेटभेटच्या सर्व वाचकांना त्यांची उत्तरे शोधण्यास मदत व्हावी म्हणुन ज्यांना आपापली उत्तरे ठाउक आहेत त्यांनी कृपया ती कमेंट्स मध्ये जरुर लिहावीत.)
0 comments:
Post a Comment